माणूस हा अण्णा भाऊंच्या चिंतनाचा केंद्रबिंदू - डॉ. अविनाश वर्धन : 01/08/2026

माणूस हा अण्णा भाऊंच्या चिंतनाचा केंद्रबिंदू - डॉ. अविनाश वर्धन : 01/08/2026

आजरा - माणूस हा अण्णा भाऊ साठे यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता त्यामुळे अण्णा भाऊ साठे मार्क्सवादी की आंबेडकरवादी या वादापेक्षा अण्णा भाऊ मानवतावादी होते, असे मत विचारवंत डॉ. अविनाश वर्धन यांनी येथे व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठी यांनी अवघ्या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यात कादंबरी, कथा, नाटक, लोकनाट्य, पोवाडे, गाणी प्रवास वर्णन असे अत्यंत विपुल लेखन केले आहे. आपल्या लेखनातून त्यांनी नव्या भारताचे स्वप्न पाहिले. गरिबी आणि दुष्काळ यात पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कामगार चळवळीचे स्फ्लुलिंग चेतवण्याचे काम अण्णा भाऊंच्या लेखणीने केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत  त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. कार्ल मार्क्स ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेत साहित्य हा जगाचा तिसरा डोळा आहे, अशी भूमिका अण्णा भाऊंनी घेतली. त्यांच्यामुळे साहित्यिक ते विचारवंत हा अण्णा भाऊंचा प्रवास अतिशय अभ्यासनीय आहे, असेही मत डॉ. वर्धन यांनी व्यक्त केले. 
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ पोतदार, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, कार्यालय अधीक्षक श्री. योगेश पाटील आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच डॉ. पोतदार, प्रा. पाटील यांची भाषणे झाली. यावेळी डॉ. आप्पासो बुडके, प्रा. सदाशिव मोरे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. सुषमा नलवडे, प्रा. गिरीश कुरूणकर, डॉ. राम मधाळे, श्री. सुधाकर वंजारे आदी उपस्थित होते.
विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. वैशाली देसाई यांनी सूत्रसंचालन तर प्रा. सुवर्णा भोकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.